Monday, February 21, 2011

REVIEW of SAAT KHOON MAAF

विशालला एक फिल्म माँफ


रस्किन बाँड यांच्या ‘सुझानाज सेव्हन हसबंड’ या लघुकथेवर आधारित ‘सात खून माँफविशाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांत मोडत नाही. ‘मकबूल’, ‘ओमकारा’ किंवा ‘कमीने’इतका तो ग्रेट नाही. पण अखेरीस तो विशालचा चित्रपट आहे, त्यामुळे ठरवूनही तो फारसा वाईट चित्रपट बनवू शकत नाही. विशालच्या चित्रपटांत आढळणारी सर्व वैशिष्टय़े याही चित्रपटात आढळून येतात.

सात खून माँफपाहिल्यावर सगळ्यात मोठं समाधान या गोष्टीचं वाटतं की, ‘कमीनेच्या व्यावसायिक यशानंतरही दिग्दर्शक विशाल भारद्वाज भ्रष्ट झालेला नाही. सात खून माँफत्याने व्यावसायिक गणितं न मांडता, स्वत:ला आवडेल तसाच बनवलाय. तो चांगला आहे की वाईट, ही नंतरची गोष्ट आहे. पण बॉक्स ऑफिसच्या यशाची चव एकदा चाखल्यानंतर, माणसाच्या रक्ताची चटक लागलेल्या नरभक्षक वाघाप्रमाणे भलेभले दिग्दर्शक बिथरतात. विशाल त्यांच्यातला नाही, ही (महत्त्वाची) बाब सात खून माँफसिद्ध करतो. त्याच्या आणि हटकेचित्रपटांच्या चाहत्यांसाठी हा दिलासा काफी आहे.

रस्किन बाँड यांच्या सुझानाज सेव्हन हसबंडया लघुकथेवर आधारित सात खून माँफविशालच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांत मोडत नाही. मकबूल’,

ओमकाराकिंवा कमीनेइतका तो ग्रेट नाही. पण अखेरीस तो विशालचा चित्रपट आहे, त्यामुळे ठरवूनही तो फारसा वाईट चित्रपट बनवू शकत नाही. विशालच्या चित्रपटांत आढळणारी सर्व वैशिष्टय़े याही चित्रपटात आढळून येतात. त्याच्या पटकथेची बांधणी, व्यक्तिरेखा, तंत्रावरची हुकूमत, त्याच्या सिनेमाचा असणारा विशिष्ट पोत हे सगळं सात खून माँफमध्येही आहेच. पण विशालच्या या आधीच्या चित्रपटांमध्ये प्रकर्षाने दिसून येणा-या एका गोष्टीचा यात अभाव आहे.. ती म्हणजे मानवी भावभावनांचा खेळ. पडद्यावर दिसणा-या कथेच्या आवरणापलीकडे लपलेल्या गोष्टींचा शोध घेणा-या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये विशालचा समावेश होतो. ओमकाराकाय, ‘मकबूलकाय, ‘कमीनेकाय किंवा अगदी फारसा पाहिला न गेलेला द ब्ल्यू अम्ब्रेला’ (पुन्हा रस्किन बाँड) काय, त्याच्या सर्व चित्रपटांमध्ये कथा या केवळ निमित्तमात्र असतात. या कथांच्या माध्यमातून त्याला मानवी प्रवृत्ती दाखवायची असते, माणसावर चढलेली संस्कृतीची पुटं तो ओरबाडून काढतो, तोऱ्यात वावरणारा मिजासखोर माणूसही किती कमकुवत आहे, हे तो दाखवत असतो. सात खून माँफनेमका यात कमी पडतो.

ख-या प्रेमाच्या शोधात एकामागोमाग एक सहा लग्नं करणा-या आणि आपल्या या सहाही नव-यांना मारून टाकणा-या (तरीही सात खून माँफका? सिनेमा बघा!) सुझाना जोहान्सची (प्रियंका चोप्रा) ही कथा आहे. सहाही नव-यांच्या व्यक्तिरेखा एकमेकांपासून पूर्ण वेगळ्या दाखवण्यात, ठसवण्यात विशाल भारद्वाज यशस्वी झालाय. इन फॅक्ट सुझानाच्या वन डायमेन्शनल व्यक्तिरेखेच्या पार्श्वभूमीवर या सहा व्यक्तिरेखांचं वैविध्य अधिकच उठून दिसतं. इरफान खान, नसीरुद्दीन शाह, अन्नू कपूर, नील नितीन मुकेश यासारखे कसलेले कलाकार या व्यक्तिरेखांमध्ये असल्यामुळे विशालचं काम आणखी सोपं झालंय.

पण, विशाल सुझानाच्या मनाचा थांग शोधण्याचा प्रयत्न करत नाही. तिची सहा लग्नं आणि तिच्या नव-यांचे खून एकामागोमाग एक, एपिसोडिक पद्धतीने येत जातात. खून केल्यानंतर किंवा पुन्हा लग्न करताना सुझानाची विचारप्रक्रिया, तिच्या मनात चाललेली खळबळ किंवा खून केल्यानंतरची घालमेल यातलं काहीच प्रेक्षकाला दिसत नाही. विशालने पटकथेची बांधणीही सरळसोट पद्धतीने केली आहे. त्यामुळे पहिली दोन लग्नं आणि खुनांनंतर चित्रपटाचा पॅटर्न निश्चित होऊन जातो आणि नावीन्य संपतं. सुझानाच्या आयुष्यात येणारा पुरुष, त्यांचं होणारं लग्न, पुरुषाकडून तिचा भ्रमनिरास होणं आणि तिने त्याला संपवणं या प्रक्रियेच्या पलीकडे चित्रपट (शेवटाचा अपवाद वगळता) जात नाही. विशालच्या चित्रपटाकडून इतका वरवरचेपणा किंवा साधेपणा अपेक्षित नाही. मग मनाचे गुंतागुंतीचे खेळ कोणी दाखवायचे? त्यातही गडबड अशी आहे की, तिच्या वाटय़ाला येणारे सगळेच पुरुष एका पातळीवर खलप्रवृत्तीचे, तिला फसवणारे आहेत. त्यामुळे सुझानाची बाजू एकदम न्याय्य होऊन जाते. त्याऐवजी या व्यक्तिरेखांचं चित्रण आपल्याच दुर्गुणांचे बळी ठरलेले पुरुष असं दाखवलं गेलं असतं तर हा सामना वेगळ्या पातळीवर गेला असता आणि या पुरुषांनाही त्यांची एक बाजू मिळाली असती.

प्रियंका चोप्राने सुझाना रंगवण्यासाठी मेहनत घेतली आहे. सुंदर तरुणीपासून वृद्ध होत जाण्यापर्यंतची प्रक्रिया मेकअपबरोबरच प्रियंकाच्या देहबोलीतूनही जाणवते. पण मुळातच तिच्या व्यक्तिरेखेला फारसे कंगोरे नाहीत. त्यामुळे लिखाणातून तिला साह्य मिळालेलं नाही. इरफान खानचा विकृत कवी टेरिफिक आहे. सुरुवातीला सामान्य वाटणा-या या शायरच्या डोळ्यात नंतर नंतर वेडसरपणाची झाक दिसत जाते, हा बदल इरफानने छान दाखवलाय. सुझानावर लट्ट झालेला आणि केवळ शारीर आकर्षणाचा बळी ठरलेला, अन्नू कपूरचा इन्स्पेक्टर भन्नाट आहे. इतक्या चांगल्या कलाकाराला इतक्या वर्षात हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याही चांगल्या भूमिका मिळू नयेत, हे आपलं दुर्दैव. नील नितीन मुकेशनेही मेजर रॉड्रिग्ज चांगला साकारलाय. नसीरुद्दीन शाहचा मुलगा विवान याने यातून पदार्पण केलंय, जे लक्षात राहणारं आहे. त्याने अत्यंत समजून आपली भूमिका केली आहे. नसीरुद्दीन शाह, जॉन अब्राहम, उषा उत्थुप (तीच ती, गायिका), रशियन कलावंत यांची कामगिरी ठीकठाक. सुझानाच्या घरातील मदतनीसाची भूमिका करणारा कलाकारही लक्षात राहतो.

संगीत हा विशाल भारद्वाजच्या चित्रपटाचा नेहमीच स्ट्राँग पॉइंट असतो. इन फॅक्ट मनासारखं संगीत करता यावं म्हणूनच दिग्दर्शनाकडे वळलेल्या विशालकडून ते अपेक्षितच आहे. पण सात खून माँफमध्ये डार्लिगवगळता अन्य गाणी फारशी लक्षात राहत नाहीत. चित्रपट पाहताना ती गाणी आवडतात, चित्रपटाच्या मूडशीही जुळतात. पण त्यांच्यात फारसा गोडवा नसल्यामुळे नंतर लक्षात राहत नाहीत. श्रीकार प्रसादचं संकलन प्रभावी आहे. रंजन पलितचं छायालेखनही अव्वल दर्जाचं आहे.

एकंदरीत, ‘सात खून माँफविशाल भारद्वाजच्या चित्रपटाकडून असलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण करत नाही, पण विशालचा चित्रपट पाहायचा असतोच. तेव्हा हा एक चित्रपट आपण त्याला माफ करू या.

Monday, January 24, 2011

review of dhubi ghat

ये है मुंबई मेरी जान!


"किरण रावने मुंबईची विविध, विलोभनीय रूपं दाखवताना यातल्या कुठल्याच कथानकाचं फेअरीटेल करण्याचं टाळलंय. म्हणूनच प्रत्येक व्यक्तिरेखा आपापली अपरिहार्य वाट चालत राहाते. दिग्दर्शकाने अत्यंत प्रेमाने या व्यक्तिरेखा (मुंबईसहीत) प्रेक्षकांसमोर सादर केल्या आहेत. म्हणूनच चित्रपट संपल्यानंतरही त्या आपल्या मनाचा ताबा सोडत नाहीत. कुठलीही गोष्ट आव आणून केलेली नाही. म्हणूनच यातलं बॅकग्राउंड म्युझिकही (टेरिफिक असूनही) संयत आहे, यातल्या भावनिक कल्लोळासारखंच."

किरण राव आमीर खानची बायको नसती, तर धोबी घाटबनला असता का? बनला असता तर इतक्या कमर्शियल सेटअपमध्ये बनून, इतक्या अपेक्षा निर्माण करून प्रदर्शित झाला असता का? ‘धोबी घाटचं स्ट्रक्चर इतकं वेगळं आहे (हिंदी सिनेमासाठी) की, आमीर नसता तर कदाचित हा सिनेमा बनला नसता आणि किरण आमीरची बायको नसती, तर कदाचित आमीरने त्यात कामही केलं नसतं. धोबी घाटब्रिलियण्ट आहेच, पण त्यातला वेगळेपणा सुखावून सोडणारा आहे. फार क्वचित असा सिनेमा पाहण्यात येतो, जो संपल्यानंतरही प्रेक्षकाला त्या सिनेमाने तयार केलेल्या कोषात गुंतून राहावसं वाटतं. धोबी घाटमध्ये असे असंख्य क्षण आहेत जे सिनेमा संपल्यानंतरही मनात रेंगाळत राहतात. सिनेमाचा जो एकंदरीत मूड आहे, तो घेऊनच आपण थिएटरच्या बाहेर पडतो आणि त्या मूडमधून बाहेर पडूच नये, असं वाटत राहातं. सुरुवात-मध्य-शेवट इतक्या सरळसोट-बाळबोध वळणाच्या(च) कथा पडद्यावर पाहण्याची इच्छा असलेल्या प्रेक्षकांनी धोबी घाटच्या वाटय़ाला जाऊ नये. जबर निराशा पदरी येईल. सिनेमाला कथा नाही. त्याऐवजी पडद्यावर दिसतो तो मुंबई नामक मायावी नगरीच्या अनेकविध रुपांचा आणि इथल्या माणसांचा बहुरंगी कोलाज.. आकर्षक, हवाहवासा, झपाटून टाकणारा, हुरहूर लावणारा! मुंबई ही इथली पाचवी व्यक्तिरेखा आहे. इतर व्यक्तिरेखांइतकीच जिवंत, रसरशीत. अमेरिकेतून सुटी घेऊन आलेल्या शायला (मोनिका डोग्रा) तिची विविध रुपं टिपायची आहेत. तिच्यासाठी सगळंच नवं आहे. आपल्याआपल्यातच राहणारा, अबोल, अस्वस्थ चित्रकार अरुण याला मुंबई त्याची रखेल वाटते. तिच्यापासून प्रेरणा घेऊन तो आपल्या कॅनव्हासवर रंग भरतो. किरण रावच्या या सिनेमात चाकोरीतलं काहीच नाही. ना पटकथेची बांधणी, ना चित्रपटाचा शेवट, ना चित्रपटाला दिलेली ट्रीटमेंट. चित्रपटात एक प्रकारचा शांतपणा आहे, ठेहराव आहे, जो कमालीचा लोभस आहे. रेल्वे रुळाच्या शेजारी बसून पहाटेच्या वेळी, अंधारात गुपचूप आंघोळ करणारा नायक कधी पाहिलाय? तो इथे दिसतो. मुन्ना (प्रतीक बब्बर) दिवसा धोबी घाटावर कपडे धुतो, इस्त्री झालेले कपडे ग्राहकांच्या घरी पोहोचवतो आणि रात्रीच्या वेळी म्युनिसिपालटीसाठी गल्लीबोळातले उंदीर मारायचं काम करतो.

अरुणच्या आर्ट एग्झिबिशनमध्ये शाय त्याला भेटते. तिला त्याच्याविषयी कुतुहल निर्माण होतं. दोघे एका रात्रीसाठी एकत्र येतात आणि वेगळे होतात. अरुण आपलं जुनं घर सोडून गजबजलेल्या मोहम्मद अली रोडवरच्या एका छोटय़ा घरात राहायला येतो. तिथे आधीच्या बि-हाडकरूच्या तीन व्हिडिओटेप्स, गळ्यातली चेन आणि अंगठी या वस्तू त्याला सापडतात. त्या व्हिडिओटेप्स म्हणजे यास्मिनने (क्रिती मल्होत्रा) आपल्या भावासाठी रेकॉर्ड केलेली पत्रं आहेत, जी ती कधीच त्याला पाठवू शकत नाही. जौनपूरसारख्या छोटय़ा शहरातून लग्न होऊन आलेली यास्मिन मुंबईभर भटकत, तिची विविध रुपं आपल्या कॅमे-यात बंदिस्त करत जाते. अरुण यास्मिनच्या विश्वात गुंतत जातो. दिग्दर्शकाने अरुण आणि यास्मिनचं हे नातं सुरेख दाखवलं आहे. एकीकडे स्वत:च्या भूतकाळाशी झगडणारा, जगापासून अलिप्त राहू पाहणारा अरुण ओळखदेखही नसलेल्या या यास्मिनमध्ये गुंतत जातो आणि तिच्या कथेतच त्याला आपलं चित्र सापडतं. दुसरीकडे शाय आणि मुन्नाची स्वतंत्र कथा सुरू होते. इस्त्रीचे कपडे पोहोचवण्यासाठी आलेल्या मुन्नाशी शायची ओळख होते आणि ती त्याच्याबरोबर मुंबईत फोटो काढत फिरू लागते. मुन्नाला चित्रपटात हिरो बनायचंय, पण तो ज्या परिस्थितीत राहतो, ज्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतो, त्याची आणखी एक वेगळी कथा आहे. किरण रावने मुन्ना-शायमधलं अनामिक नातं छान चितारलंय.

किरण रावने मुंबईची विविध, विलोभनीय रूपं दाखवताना यातल्या कुठल्याच कथानकाचं फेअरीटेल करण्याचं टाळलंय. म्हणूनच प्रत्येक व्यक्तिरेखा आपापली अपरिहार्य वाट चालत राहाते. दिग्दर्शकाने अत्यंत प्रेमाने या व्यक्तिरेखा (मुंबईसहीत) प्रेक्षकांसमोर सादर केल्या आहेत. म्हणूनच चित्रपट संपल्यानंतरही त्या आपल्या मनाचा ताबा सोडत नाहीत. कुठलीही गोष्ट आव आणून केलेली नाही. म्हणूनच यातलं बॅकग्राउंड म्युझिकही (टेरिफिक असूनही) संयत आहे, यातल्या भावनिक कल्लोळासारखंच.

प्रतीक बब्बरचे विलक्षण बोलके डोळे आणि त्याच्या चेह-यावरची व्हल्नरेबिलिटी यांचा सुरेख वापर दिग्दर्शकाने केलाय. त्याचा स्क्रीन प्रेझेन्स प्रेक्षकाला स्वत:कडे खेचून घेतो. प्रेक्षक मुन्नाच्या विश्वाशी एकरूप होतो, त्याच्यासोबत हसतो, त्याच्यासाठी हळहळतो. अमेरिकेहून सुट्टीवर आलेल्या इन्व्हेस्टमेंट बँकर कम फोटोग्राफरच्या भूमिकेत मोनिका डोग्रा (तिच्या अ‍ॅक्सेंटसह) शोभून दिसली आहे. अपरिचित, फ्रेश चेहरा आणि मोनिकाचा आत्मविश्वास यामुळे शाय दीर्घकाळ लक्षात राहील. इतकी चाकोरीबाहेरची आणि मुख्य म्हणजे चित्रपटाचा मुख्य फोकस नसलेली भूमिका केल्याबद्दल आमीरचं कौतुक करायला हवं. पण फ्रँकली आमीर-किरणने मुलाखतींमधून दावा केल्याप्रमाणे या भूमिकेसाठी आमीरच हवा होता, असं वाटत नाही. आमीर बीइंग आमीर, त्याने अरुण उत्तमच केलाय. भूमिकेतले बारकावे, सूक्ष्म भावना टिपणं, यास्मीनबद्दलचं वास्तव समजल्यानंतरचं त्याचं हादरणं हे सगळंच अप्रतिम आहे. पण या भूमिकेसाठी आमीरच अपरिहार्य होता, असं वाटत नाही. यास्मीन रंगवणारी क्रिती मल्होत्राही नैसर्गिक आहे.

पडद्यामागची बहुतांश टीम नवी आहे. लेखक-दिग्दर्शक म्हणून किरण रावचं हे पदार्पण आश्वासक आहे. भविष्यात असेच उत्तम सिनेमे तिच्याकडून पाहायला मिळतील, याची खात्री देणारं हे पदार्पण आहे. तुषार कांती रेचं छायालेखन अप्रतिम आहे. मुंबईचे विविध रंग टिपण्याची, अत्यंग गर्दीच्या ठिकाणी (अनेकदा छुप्या पद्धतीने) चित्रिकरण करूनही आवश्यक तो परिणाम मिळवण्याची अवघड जबाबदारी त्याच्यावर होती, ती त्याने यशस्वीरित्या पार पाडली आहे. अर्जेटिनाचा प्रसिद्ध संगीतकार गुस्तावो सँताओलाला (ब्रोकबॅक माउंटन, बेबल) याचं पार्श्वसंगीत चित्रपटाचा परिणाम गडद करणारं आहे. ट्रीटमेंटची गरज ओळखून त्याने संगीताचा टोन सौम्य ठेवला आहे.

एकंदरीत, वेगळ्या सिनेमाकडे नजर लावून बसलेल्यांसाठी तर हा मस्ट सीआहेच; पण फक्त गल्लाभरू सिनेमाचीच चटक असणा-यांनीही, ‘चांगला सिनेमा काय असतो’, हे पाहण्यासाठी या धोबी घाटावर अवश्य जावं.

Monday, January 10, 2011

नो वन किल्ड जेसिका- पॉवरपॅक्ड

नो वन किल्ड जेसिका- पॉवरपॅक्ड

एक ब्रिलियंट दिग्दर्शक काय करू शकतो? जेसिका लाल हत्या प्रकरणासारखा परिचित, भरपूर प्रसिद्धी मिळालेला विषय घेऊन, त्यातले सगळे बारकावे प्रेक्षकांना माहीत अतानाही त्यात असंख्य छोटेछोटे उल्लेखनीय क्षण निर्माण करून एक बेहेतरीन, पॉवरफुल सिनेमा निर्माण करू शकतो. दिग्दर्शक राजकुमार गुप्ताने नेमकं तेच केलंय. पदार्पणातच आमीरसारखा टेरिफिक सिनेमा देणा-या गुप्ताने नो वन किल्ड जेसिकामध्ये आपल्या कर्तृत्वाचे स्फोट घडवले आहेत.

दिल्लीत झालेल्या जेसिका लाल हत्येच्या घटनेवर हा चित्रपट आधा
रित आहे. हे प्रकरण सगळ्यांनाच माहीत असल्यामुळे चित्रपटाची कथा पुन्हा सांगण्यात अर्थ नाही. पण, गुप्ताने पटकथेत बारीकसारीक गोष्टी अशा खुबीने पेरल्यात की, आपण एका विलक्षण बुद्धिमान दिग्दर्शकाचा सिनेमा पाहतोय, हे पहिल्या फ्रेमपासून जाणवत राहतं. यातल्या व्यक्तिरेखा अभ्यासण्यासारख्या आहेत आणि अर्थातच पटकथा. एखाद् दोन किरकोळ दोष वगळता पटकथेत त्रुटी नाहीत.

गुप्ताने चित्रपटाचे सरळ दोन भाग केले आहेत. पहिल्या भागात जेसिकाची हत्या
, पोलिस तपास, न्यायालयीन खटला, साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न, साक्षीदार फुटू नयेत म्हणून जेसिकाची बहीण सब्रिनाची चाललेली धडपड, घालमेल आणि पैसा व सत्तेसमोर हतबल होऊन पराभव पत्करणं हा सगळा भाग येतो. हे एकीकडे चाललेलं असतानाच पत्रकार मीराची व्यक्तिरेखा एस्टॅब्लिश होते. निर्भीड, धाडसी आणि हाय प्रोफाइल पत्रकार. कारगिल युद्धात युद्धभूमीवरून रिपोर्टिग करणारी मीरा तिच्या वाहिनीची स्टार पत्रकार आहे. स्पष्टवक्ती, शिवराळ आणि तिच्याच भाषेत सांगायचं तर बिचम्हणजे कुत्री. सुरुवातीला ती जेसिका लाल प्रकरणाला महत्त्व देत नाही. पबमध्ये ३०० माणसांच्या समोर झालेली ही हत्या म्हणजे तिच्या लेखी ओपन अँड शटकेस असल्यामुळे तिला त्यात काहीच आव्हान दिसत नाही. पण पुराव्याअभावी आरोपी सुटतात आणि तिला धक्का बसतो. मध्यांतरावरचा हा पंच गुप्ताने सुरेख घेतला आहे. मीरा हे प्रकरण हाती घ्यायचं ठरवते त्यामागे अन्यायाविरुद्धची चीड याबरोबरच या प्रकरणाचं महत्त्व आपण ओळखू शकलो नाही, त्याचे कंगोरे आपण ध्यानातच घेतले नाहीत, हा तिला पत्रकार म्हणून स्वत:चा पराभव वाटतो. त्यामुळेच ती हे प्रकरण हाती घ्यायचं ठरवते.

गुप्ताने पटकथेची बांधणी अत्यंत हुशारीने केली आहे. हा दोन महिलांचा अन्यायाविरुद्ध लढा असला तरी त्यांचा एकत्र लढा नाही. पूर्वार्धात राणी आणि विद्या केवळ एका प्रसंगात समोरासमोर येतात. इन फॅक्ट पूर्वार्धात राणीची व्यक्तिरेखा या लढय़ात कुठेही नाही. हा सगळा भाग विद्याच्या खांद्यांवर आहे. विद्याची व्यक्तिरेखा अत्यंत संयत (आणि राणीच्या व्यक्तिरेखेला 100 टक्के काँट्रास्ट) आहे आणि तिने ती टेरिफिक केलीये. बहीण गमावल्याचं दु:ख
, म्हातारे आईबाप त्यामुळे न्यायासाठी तिची एकटीचीच चाललेली धावपळ, पोलिसांनी तपास नीट करावा म्हणून साक्षीदारांनी उलटू नये म्हणून तिची चाललेली धडपड, न्याय नाकारला गेल्यानंतर इथल्या व्यवस्थेवरचा तिचा उडालेला विश्वास आणि त्यामुळे तिचं स्वत:च्याच कोषात जाणं हे विद्याने तर सुरेख दाखवलंच आहे, पण मुळात लिखाणातूनही हे सगळे पैलू अत्यंत प्रभावाने समोर येतात. एका प्रसंगात आपल्याच तंद्रीत चाललेली सब्रिना अचानक हत्तीच्या समोर येते आणि क्षणभर गांगरते. तिचा सामना काय ताकदीच्या लोकांशी आहे आणि तिच्यासमोरचं आव्हान किती मोठं आहे, हे अवघ्या एका सेकंदात संवादांचा आधार न घेता दिग्दर्शक दाखवतो. सिंपली ब्रिलियंट!! आणि मध्यांतरानंतर इट्स ऑल राणीज शो.

उत्तरार्धातही विद्या आणि राणी क्लायमॅक्स आणि त्यापूर्वीचा एखादा प्रसंग वगळता एकत्र येतच नाहीत. पत्रकार मीरा स्वतंत्रपणे
जस्टिस फॉर जेसिकाकँपेन चालवते. लोकांचा वाढता पाठिंबा बघून ती सब्रिनाला गाठण्याचा प्रयत्न करते. पण न्यायावरचा विश्वास उडालेली सब्रिना पुन्हा या लढय़ात उतरण्यास नकार देते, त्यावेळी मीराचा होणारा स्फोट आणि त्यातला राणीचा अभिनय बघण्यासारखा आहे.

असे असंख्य क्षण लेखक-दिग्दर्शक गुप्ताने
नो वन किल्ड जेसिकामध्ये निर्माण केले आहेत, ज्यामुळे एक अत्यंत पॉवरफुल ड्रामा पाहायला मिळतो, तेही मेलोड्रामा किंवा सवंगपणाच्या आहारी न जाता. अमित त्रिवेदीचं टेरिफिक टायटल साँग सुरुवातीलाच वापरून गुप्ता पहिलेछूट आपली मानसिकता तयार करतो. इथून पुढे एक क्षणही आपली नजर पडद्यावरून हलणार नाही, याची काळजी त्याने घेतली आहे. सुरुवातीला राणीच्या आवाजातील निवेदनात जेसिका प्रकरण घडलं त्याच्या आजूबाजूच्या सामाजिक-राजकीय घटनांचा लेखाजोखा देत त्याने तो काळ उभा केला आहे. 1998 मध्ये भारताने केलेली अणुचाचणी आणि त्यापाठोपाठ पुढच्याच वर्षी कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर देशात निर्माण झालेलं वातावरण आणि आपण भारतीय असल्याच्या भावनेने एकत्र आलेले लोक यांचा सुरुवातीलाच दिलेला संदर्भ उत्तरार्धात जस्टिस फॉर जेसिकासाठी लोकांची एकत्र येण्याची प्रक्रिया अधिक अर्थपूर्ण करतो. केवळ मीरा आणि सब्रिनाच नव्हे, तर या प्रकरणाचा तपास करणारा पोलिस अधिकारी एन. के. (राजेश शर्मा - टेरिफिक) आणि आरोपीचा वकील श्याम तोलानी या व्यक्तिरेखाही अस्सल झाल्या आहेत. जेसिकाची भूमिका करणारी मायराही लक्षात राहते.

पण पटकथेची इतकी बंदिस्त बांधणी करणा-या
, व्यक्तिरेखांवर इतकी मेहनत घेणाऱ्या गुप्ताने सब्रिनाचे आई-वडील आणि जेसिकाची हत्या करणा-या प्रमुख आरोपीची आई या व्यक्तिरेखा कॅरिकेचरिश रंगवल्या आहेत. दिल्लीतले अत्यंत पॉवरफुल राजकारणी आणि मंत्री असलेल्या, आरोपीच्या वडिलांची व्यक्तिरेखाही अगदी सौम्य आहे. पटकथेतली एक ढोबळ चूक म्हणजे या मंत्र्याला मुख्यमंत्री राजीनामा द्यायला सांगतात, तेव्हा फोनवरून मुख्यमंत्र्याचा जो आवाज येतो, तो पुरुषाचा आहे आणि नंतरच्या एका प्रसंगात मीडिया दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया विचारते, त्यावेळी महिला मुख्यमंत्री (शीला दीक्षित?) आहे. या दोन्ही प्रसंगांमध्ये फार कालावधी लोटलेला नाही. त्यामुळे मधल्या काळात मुख्यमंत्री बदलला गेला असण्याची शक्यताही नाही.

पण हे दोष नजरेआड केले पाहिजेत. कारण
आय हेट लव स्टोरीजसारख्या अर्थहीन गुळमुळीत आणि नो प्रॉब्लेमसारख्या बिनडोक कॉमेडी चित्रपटांचा मारा होत असताना नो वन किल्ड जेसिकासारखा पॉवरफुल, बुद्धिमान सिनेमा बघायला मिळणं, यासारखं दुसरं सुख नाही. जस्ट गो फॉर इट!!
  • चित्रपट: नो वन किल्ड जेसिका
  • पटकथा -दिग्दर्शक: राजकुमार गुप्ता
  • संगीत :अमित त्रिवेदी
  • कलाकार: विद्या बालन, राणी मुखर्जी,राजेश शर्मा, मायरा

Saturday, January 8, 2011

कॅलेंडर- 2011

एक वर्ष संपून दुसरं आलं तरी सिनेमाचा खेळ काही संपत नाही आणि सिनेमाच्या चाहत्यांच्या अपेक्षाही. सरत्या वर्षात कितीही अपेक्षाभंग पदरी आला असला तरी नव्या वर्षात येणा-या चित्रपटांविषयी उत्सुकता असतेच. म्हणूनच 2011 मध्ये प्रदर्शित होणा-या काही महत्त्वाच्या सिनेमांचा हा धावता आढावा खास तुमच्यासाठी..

  • 14 जानेवारी- यमला पगला दिवाना
काही काही सिनेमे प्रोमोजपासूनच लक्ष वेधून घेतात आणि सिनेमाविषयी जबरदस्त कुतुहल निर्माण करतात. गेल्या वर्षी दबंगचं तसं झालं होतं. तेच यमला पगला दिवानाच्या बाबतीतही होताना दिसतंय. मुळात धमेंद्र, सनी आणि बॉबी हे तीन देओल एका सिनेमात एकत्र येणं चित्रपट हॉट करण्यास पुरेसं आहे. त्यात तिघांनी शिखांच्या भूमिकेत पडद्यावर धमाल केल्याचा फील देण्यात प्रोमोज यशस्वी ठरलेत. तिघांनी पूर्वी एकत्र काम केलेला अपने अनपेक्षितरित्या हिट झाला होता. त्यामुळेच समीर कर्णिकसारखा फ्लॉप दिग्दर्शक असूनही चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. इंडस्ट्रीलाही या वर्षीचा, मल्टिप्लेक्सच्या मर्यादा ओलांडून जाणारा पहिला हिट याच चित्रपटाच्या रुपाने मिळेल, अशी आशा आहे.
  • 21 जानेवारी- धोबी घाट
आमीर खानचा चित्रपट, मग तो त्यात केवळ अभिनेता म्हणून असो किंवा पीपली लाइव्हप्रमाणे नुसताच निर्माता असो. आमीरच्या चित्रपटाबद्दल जबरदस्त उत्सुकता असते. आमीरचा चित्रपट म्हणजेच काहीतरी चांगलं, सकस आणि वेगळं पाहायला मिळणार याची खूणगाठ प्रेक्षकांनी बांधून ठेवली आहे. म्हणूनच धोबी घाटबद्दल घोषणेपासूनच उत्सुकता होती. त्यात प्रोमोजपाहून भरच पडली आहे. अर्थात हा चित्रपट थ्री इडियट्स किंवा दबंगप्रमाणे युनिव्हर्सल हिट होईल किंवा व्हावा, अशी आमीर किंवा त्याची दिग्दर्शक पत्नी किरण राव यांचीच अपेक्षा नाही. कारण, या चित्रपटाची हाताळणी, सेन्सिबिलिटीज शहरी, उच्चभ्रू, मल्टिप्लेक्सवाल्या प्रेक्षकांच्या जवळ जाणा-या आहेत. या चित्रपटाचा हा क्लास त्याच्या प्रोमोजमधूनही दिसतो. शिवाय, जाने तू या जाने नात झालेल्या कौतुकानंतर तब्बल अडीच वर्षानी पडद्यावर (हॉट) दिसणा-या प्रतीक बब्बरबद्दलही जबरदस्त कुतुहल आहे. मर्यादित बजेटमध्ये सकस सिनेमा करून तो सुपरहिट करण्याची आमीरची खुबी पाहता धोबी घाटचं भवितव्य जवळपास निश्चित मानलं जात आहे.
  • 28 जानेवारी-दिल तो बच्चा है जी
चाकोरीबाह्य चित्रपटांचा आघाडीचा शिलेदार म्हणून मिरवता मिरवता स्वत:च्याच चाकोरीत अडकलेल्या मधुर भांडारकरने चाकोरी भेदण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. हलकाफुलका, नर्मविनोदी अशी, मधुरच्या चित्रपटाशी सहसा जोडली न जाणारी वैशिष्टय़ या चित्रपटात आढळतील, असे संकेत चित्रपटाचे प्रोमोज देत आहेत. रिअलिस्टिक, डार्क चित्रपटांचा दिग्दर्शक ही आपली ओळख झटकण्यासाठी जाणीवपूर्वक वेगळा प्रयत्न करणा-या मधुरच्या या चित्रपटाबद्दल म्हणूनच अपेक्षा आहेत. अजय देवगण-इम्रान हाश्मी ही गेल्या वर्षीच्या सुपरहिट वन्स अपॉन अ टाइममधली गँगस्टर जोडी इथे संपूर्ण वेगळ्या रुपात दिसेल. तर थ्री इडियट्समधला प्रख्यात बलात्कारी पुरुष चतुर रामलिंगम अर्थात ओमी वैद्य हेही याचं प्रमुख आकर्षण आहे.
  • 18 फेब्रुवारी- सात खून माफ
कमीने आणि त्यापाठोपाठ इश्किया या दोन चित्रपटांमुळे विशाल भारद्वाज इज इन बिग लिग. त्यामुळे सात खून माफ हा या वर्षीचा मच अवेटेड चित्रपट (नायिकाकेंद्रित असूनही) आहे. रस्किन बाँड यांच्या सुझानाज सेव्हन हसबंड या कथेवर आधारित या चित्रपटात नायिका (प्रियांका चोप्रा) एकामागोमाग एक आपल्या सात नव-यांचा खून करते, अशी मध्यवर्ती कल्पना आहे. या सात नव-यांच्या भूमिकांमध्ये नसीरुद्दीन शाह, जॉन अब्राहम, नील नितीन मुकेश, इरफान खान, आदी नामवंत कलाकार दिसणार आहेत. विशाल भारद्वाजने यापूर्वीही रस्किन बाँड यांच्या द ब्ल्यू अंब्रेला या लघुकथेवरून याच नावाचा नितांतसुंदर चित्रपट बनवला होता. त्याच्या सिनेमांची टॅरँटिनो शैली आणि अभिजात साहित्यावरून उत्तम सिनेमे बनवण्याची त्याची हातोटी (मकबूल, ओमकारा, द ब्ल्यू अंब्रेला) यामुळे सात खून माफबद्दल कमालीची उत्सुकता आहे.
  • 11 फेब्रुवारी-पतियाला हाऊस
पतियाला हाऊसच्या निमित्ताने एक विलक्षण योगायोग जुळून आला आहे. दोन वर्षापूर्वी अक्षयकुमारच्या मागे अपयशाचा फेरा सुरू करणा-या चांदनी चौक टू चायनाचा दिग्दर्शक निखिल अडवानी होता आणि आता हा फेरा संपण्यासाठी अक्षयची भिस्त ज्या पतियाला हाऊसवर आहे, त्याचाही दिग्दर्शक निखिल अडवानीच आहे. भारतीय संस्कृती (म्हणजे पंजाबी) विरुद्ध पाश्चात्य संस्कृती यांच्यातला संघर्ष (?) चितारणारा अक्षयचा नमस्ते लंडन सुपरहिट झाला होता. पतियाला हाऊसमध्येही हाच मसाला (अगदी पंजाबी पार्श्वभूमीसह) आहे. शिवाय त्याला खेळाची जोड देण्यात आली आहे. अक्षयसोबत प्रथमच अनुष्का शर्माची जोडी जमवण्यात आली आहे. ऋषी कपूरही एका दमदार भूमिकेत आहे.
  • 22 एप्रिल दम मारो दम
अभिषेक बच्चन आणि दिग्दर्शक रोहन सिप्पी ही ब्लफमास्टरची यशस्वी जोडी य चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे. अत्यंत हुशारीने लिहिलेली पटकथा आणि त्यावरची दिग्दर्शकाची हुकुमत ही रमेश सिप्पीच्या सिनेमांची वैशिष्टय़ त्याच्या मुलाच्या या चित्रपटातही दिसली होती. म्हणूनच दम मारो दम बद्दल उत्सुकता आहे. गोव्यातील ड्रग रॅकेटवर आधारित फॅक्ट्स आणि फिक्शनच्या सीमारेषेवर घुटमळणारा हा सिनेमा अभिषेक बच्चनसाठीही महत्त्वाचा आहे. परदेशात फिलॉसॉफीचा अभ्यास करून आलेल्या रोहन सिप्पीने ब्लफमास्टर आणि टॅक्सी नं. 9 2 11 या दोन्ही वेगवान सिनेमांमध्येही मानवी भावभावनांचं उत्तम चित्रण केलं होतं. म्हणूनच आता ड्रग रॅकेटसारख्या थ्रिलरच्या अंगाने जाणा-या चित्रपटात तो काय वेगळेपणा आणतो, हे पाहाणं रोचक ठरणार आहे.
  • 27 मे रेडी
दबंगच्या झंझावाती यशानंतर प्रदर्शित होणारा सलमान खानचा या वर्षातला हा पहिलाच चित्रपट. दिग्दर्शकाच्या खुर्चीत अनीस बाज्मी असला तरी यात त्याच्या नेहमीच्याच कॉमेडीला अ‍ॅक्शनचीही फोडणी देण्यात आली आहे. तेलुगूतल्या याच नावाच्या सुपरहिट चित्रपटाचा हा रिमेक आहे. सलमानसोबत असिनची जोडी जमवण्यात आली आहे. शिवाय, परेश रावल, महेश मांजरेकर हेही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.
  • 27 मे रॉकस्टार
सुपरहिट सिनेमे आणि तगडय़ा परफॉर्मन्सेसनी सुपरस्टारपदावर हक्क सांगणा-या रणबीर कपूरचा सिनेमा म्हणून रॉकस्टारला महत्त्व आहेच; शिवाय जब वी मेट आणि लव आज कलवाल्या इम्तियाझ अलीचा सिनेमा म्हणूनही रॉकस्टारबद्दल उत्सुकता आहे. पारंपरिक प्रेमकथांना नव्या युगात अत्यंत तजेलदार पद्धतीने सादर करणारा नव्या पिढीतला आश्वासक दिग्दर्शक म्हणून इम्तियाझ अली तरुण प्रेक्षकांचा लाडका झालाय. इन फॅक्ट जब वी मेट तर या दशकातलं लव स्टेटमेंट बनलाय. त्यामुळेच या दोन सुपरस्टार्सना (दिग्दर्शकासाठीही हे विशेषण वापरायला काय हरकत आहे?) एकत्र आणणारा रॉकस्टार या वर्षीचा महत्त्वाचा सिनेमा आहे. यात पदार्पण करणा-या नर्गिस फाक्री या मॉडेलकडेही सिनेसृष्टीच्या नजरा लागून राहिल्या आहेत. पदार्पणापासून अनेक नायिकांशी नाव जोडलं गेलेल्या रणबीरचं सध्या नर्गिसशी अफेअर सुरू असल्याच्या चर्चेलाही ऊत आला आहे. त्यामुळेही सिनेमा आतापासूनच चर्चेत आहे.
  • 27 मे जिंदगी ना मिलेगी दुबारा
लक बाय चान्ससारखा उत्तम सिनेमा देणा-या झोया अख्तरचा हा चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत आहे तो त्याच्या अनयुज्वल स्टारकास्टमुळे. हृतिक रोशन आणि कतरिना कैफ या चित्रपटाच्या निमित्त प्रथमच एकत्र येत आहेत, तर देव डीची सुपरहिट जोडी अभय देओल आणि कल्की कोएचलिन हेही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. शिवाय निर्माता फरहान अख्तरही यातला एक नायक साकारतोय. त्यामुळे चित्रपट कमर्शियल की ऑफ बीट याचा थांगपत्ता लागत नाहीये. फरहान अख्तरसारखा निर्माता, रीमा कागतीसारखी (हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लिमिटेड) लेखिका आणि स्वत: झोया अख्तर या नावांमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता असणं स्वाभाविक आहे.
  • 3 जून- रा वन
गेल्या वर्षीपासून चर्चेत असलेला शाहरुख खानचा महत्त्वाकांक्षी सायफाय रा वन यावर्षी आयपीएलच्या हंगामानंतर झळकतोय. अनुभव सिन्हासारख्या फ्लॉप दिग्दर्शकाला घेऊन भरमसाठ पैसा ओतून शाहरुख हा सिनेमा बनवत असल्यामुळे या चित्रपटाविषयी इंडस्ट्रीला तर कुतुहल आहेच; शिवाय शाहरुखचा कुठलाही सिनेमा लहान नसतोच, त्यात शाहरुख पहिल्यांदाच सुपरहिरो रंगवतोय. लाखो रुपये खर्चून बनवलेला त्याचा स्पेशल सूट, तो घालून चित्रिकरण करताना त्याला कसं घुसमटायचं, रोबो प्रदर्शित झाल्यावर त्यातलं अ‍ॅनिमेशन बघून शाहरुख कसा चिंतेत पडला, मग रा वनसाठी आणखी कल्पक अ‍ॅनिमेशन्स कशी करण्यात आली वगैरे बातम्या पसरवून शाहरुखने सुरुवातीपासूनचआपल्या या चित्रपटाबद्दल पद्धतशीर वातावरणनिर्मिती केली आहे. आमीर आणि सलमान या कट्टर प्रतिस्पध्र्याच्या तुलनेत गेल्या वर्षी शाहरुखचा माय नेम इज खान अगदीच फिका वाटला. परदेशात सिनेमाने भरपूर गल्ला गोळा केला, असं शाहरुख आणि करण जोहर कँपने कितीही घसा खरवडून सांगितलं, तरी शाहरुखच्या सिनेमाला जी गर्दी अपेक्षित असते, ती माय नेम इज खानच्या वाटय़ाला आली नाही, हे सगळ्यांनीच पाहिलेलं असल्यामुळे शाहरुखसाठी रा वन हा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे.
  • मौसम-प्रदर्शन - जुलै 2011
पंकज कपूरसारखा देशातला एक सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रथमच लेखक-दिग्दर्शकाच्या भूमिकेत आणि नायकाच्या भूमिकेत त्याचा मुलगा आणि आजचा आघाडीचा स्टार शाहीद कपूर हे काँबिनेशनच मौसमबद्दल उत्सुकता निर्माण करण्यास पुरेसं आहे. त्यात पंकज कपूरने या चित्रपटाबाबत इतकी गुप्तता बाळगली आहे की, शाहीद कपूरचा इंटरनेटवर लीक झालेला लुक आणि तो या चित्रपटात एअर फोर्स पायलटच्या भूमिकेत आहे, या व्यतिरिक्त चित्रपटाबद्दल काहीही माहिती नाही. त्यामुळे या उत्सुकतेत भरच पडली आहे. मौसम पूर्ण होईपर्यंत शाहीद आणि त्याची नायिका साकारणा-या सोनम कपूरने एकही चित्रपट करायचा नाही, चित्रपटाविषयी कुठेही बोलायचं नाही, हे पंकज कपूरचे आदेश, त्याने दोघांनाही काही दिवसांची दिलेली सुटी, शाहीदला त्याचं अधूनमधून झापणं यांसारख्या बातम्यांमुळे मौसमभोवती गूढतेचं वलय निर्माण झालंय
  • डॉन टू
वर्षाचा शेवट शाहरुखच्या सिनेमाने करण्याची संधी त्याच्या चाहत्यांना डॉन टूमुळे मिळणार आहे. फरहान अख्तरने शाहरुखला घेऊन केलेला डॉनचा रिमेक सुपरहिट ठरल्याने त्याच्या या सीक्वेलचा घाट घालण्यात आला. अर्थात सीक्वेलची शक्यता पहिल्या भागातच ठेवली होती. त्यामुळे पहिल्या भागाचं कथानक यात पुढे नेण्यात येणार आहे. प्रियांका चोप्राच याही भागात शाहरुखची नायिका आहे. मधल्या काळात कॅमेऱ्याच्या समोर गेलेला फरहान अख्तर बऱ्याच काळाने पुन्हा दिग्दर्शकाच्या खुर्चीत परततोय. शाहरुख ऑर नो शाहरुख. पण नव्या पिढीतल्या एका एक्सायटिंग दिग्दर्शकाचा सिनेमा म्हणून डॉन टू बद्दल उत्सुकता आहेच.प्रदर्शन - डिसेंबर