विशालला एक फिल्म माँफ
रस्किन बाँड यांच्या ‘सुझानाज सेव्हन हसबंड’ या लघुकथेवर आधारित ‘सात खून माँफ’ विशाल
च्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांत मोडत नाही. ‘मकबूल’, ‘ओमकारा’ किंवा ‘कमीने’इतका तो ग्रेट नाही. पण अखेरीस तो विशालचा चित्रपट आहे, त्यामुळे ठरवूनही तो फारसा वाईट चित्रपट बनवू शकत नाही. विशालच्या चित्रपटांत आढळणारी सर्व वैशिष्टय़े याही चित्रपटात आढळून येतात.
‘सात खून माँफ’ पाहिल्यावर सगळ्यात मोठं समाधान या गोष्टीचं वाटतं की, ‘कमीने’च्या व्यावसायिक यशानंतरही दिग्दर्शक विशाल भारद्वाज भ्रष्ट झालेला नाही. ‘सात खून माँफ’ त्याने व्यावसायिक गणितं न मांडता, स्वत:ला आवडेल तसाच बनवलाय. तो चांगला आहे की वाईट, ही नंतरची गोष्ट आहे. पण बॉक्स ऑफिसच्या यशाची चव एकदा चाखल्यानंतर, माणसाच्या रक्ताची चटक लागलेल्या नरभक्षक वाघाप्रमाणे भलेभले दिग्दर्शक बिथरतात. विशाल त्यांच्यातला नाही, ही (महत्त्वाची) बाब ‘सात खून माँफ’ सिद्ध करतो. त्याच्या आणि ‘हटके’ चित्रपटांच्या चाहत्यांसाठी हा दिलासा काफी आहे.
रस्किन बाँड यांच्या ‘सुझानाज सेव्हन हसबंड’ या लघुकथेवर आधारित ‘सात खून माँफ’ विशालच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांत मोडत नाही. ‘मकबूल’,‘ओमकारा’ किंवा ‘कमीने’इतका तो ग्रेट नाही. पण अखेरीस तो विशालचा चित्रपट आहे, त्यामुळे ठरवूनही तो फारसा वाईट चित्रपट बनवू शकत नाही. विशालच्या चित्रपटांत आढळणारी सर्व वैशिष्टय़े याही चित्रपटात आढळून येतात. त्याच्या पटकथेची बांधणी, व्यक्तिरेखा, तंत्रावरची हुकूमत, त्याच्या सिनेमाचा असणारा विशिष्ट पोत हे सगळं ‘सात खून माँफ’मध्येही आहेच. पण विशालच्या या आधीच्या चित्रपटांमध्ये प्रकर्षाने दिसून येणा-या एका गोष्टीचा यात अभाव आहे.. ती म्हणजे मानवी भावभावनांचा खेळ. पडद्यावर दिसणा-या कथेच्या आवरणापलीकडे लपलेल्या गोष्टींचा शोध घेणा-या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये विशालचा समावेश होतो. ‘ओमकारा’ काय, ‘मकबूल’ काय, ‘कमीने’ काय किंवा अगदी फारसा पाहिला न गेलेला ‘द ब्ल्यू अम्ब्रेला’ (पुन्हा रस्किन बाँड) काय, त्याच्या सर्व चित्रपटांमध्ये कथा या केवळ निमित्तमात्र असतात. या कथांच्या माध्यमातून त्याला मानवी प्रवृत्ती दाखवायची असते, माणसावर चढलेली संस्कृतीची पुटं तो ओरबाडून काढतो, तोऱ्यात वावरणारा मिजासखोर माणूसही किती कमकुवत आहे, हे तो दाखवत असतो. ‘सात खून माँफ’ नेमका यात कमी पडतो.
ख-या प्रेमाच्या शोधात एकामागोमाग एक सहा लग्नं करणा-या आणि आपल्या या सहाही नव-यांना मारून टाकणा-या (तरीही ‘सात खून माँफ’ का? सिनेमा बघा!) सुझाना जोहान्सची (प्रियंका चोप्रा) ही कथा आहे. सहाही नव-यांच्या व्यक्तिरेखा एकमेकांपासून पूर्ण वेगळ्या दाखवण्यात, ठसवण्यात विशाल भारद्वाज यशस्वी झालाय. इन फॅक्ट सुझानाच्या वन डायमेन्शनल व्यक्तिरेखेच्या पार्श्वभूमीवर या सहा व्यक्तिरेखांचं वैविध्य अधिकच उठून दिसतं. इरफान खान, नसीरुद्दीन शाह, अन्नू कपूर, नील नितीन मुकेश यासारखे कसलेले कलाकार या व्यक्तिरेखांमध्ये असल्यामुळे विशालचं काम आणखी सोपं झालंय.
पण, विशाल सुझानाच्या मनाचा थांग शोधण्याचा प्रयत्न करत नाही. तिची सहा लग्नं आणि तिच्या नव-यांचे खून एकामागोमाग एक, एपिसोडिक पद्धतीने येत जातात. खून केल्यानंतर किंवा पुन्हा लग्न करताना सुझानाची विचारप्रक्रिया, तिच्या मनात चाललेली खळबळ किंवा खून केल्यानंतरची घालमेल यातलं काहीच प्रेक्षकाला दिसत नाही. विशालने पटकथेची बांधणीही सरळसोट पद्धतीने केली आहे. त्यामुळे पहिली दोन लग्नं आणि खुनांनंतर चित्रपटाचा पॅटर्न निश्चित होऊन जातो आणि नावीन्य संपतं. सुझानाच्या आयुष्यात येणारा पुरुष, त्यांचं होणारं लग्न, पुरुषाकडून तिचा भ्रमनिरास होणं आणि तिने त्याला संपवणं या प्रक्रियेच्या पलीकडे चित्रपट (शेवटाचा अपवाद वगळता) जात नाही. विशालच्या चित्रपटाकडून इतका वरवरचेपणा किंवा साधेपणा अपेक्षित नाही. मग मनाचे गुंतागुंतीचे खेळ कोणी दाखवायचे? त्यातही गडबड अशी आहे की, तिच्या वाटय़ाला येणारे सगळेच पुरुष एका पातळीवर खलप्रवृत्तीचे, तिला फसवणारे आहेत. त्यामुळे सुझानाची बाजू एकदम न्याय्य होऊन जाते. त्याऐवजी या व्यक्तिरेखांचं चित्रण आपल्याच दुर्गुणांचे बळी ठरलेले पुरुष असं दाखवलं गेलं असतं तर हा सामना वेगळ्या पातळीवर गेला असता आणि या पुरुषांनाही त्यांची एक बाजू मिळाली असती.
प्रियंका चोप्राने सुझाना रंगवण्यासाठी मेहनत घेतली आहे. सुंदर तरुणीपासून वृद्ध होत जाण्यापर्यंतची प्रक्रिया मेकअपबरोबरच प्रियंकाच्या देहबोलीतूनही जाणवते. पण मुळातच तिच्या व्यक्तिरेखेला फारसे कंगोरे नाहीत. त्यामुळे लिखाणातून तिला साह्य मिळालेलं नाही. इरफान खानचा विकृत कवी टेरिफिक आहे. सुरुवातीला सामान्य वाटणा-या या शायरच्या डोळ्यात नंतर नंतर वेडसरपणाची झाक दिसत जाते, हा बदल इरफानने छान दाखवलाय. सुझानावर लट्ट झालेला आणि केवळ शारीर आकर्षणाचा बळी ठरलेला, अन्नू कपूरचा इन्स्पेक्टर भन्नाट आहे. इतक्या चांगल्या कलाकाराला इतक्या वर्षात हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याही चांगल्या भूमिका मिळू नयेत, हे आपलं दुर्दैव. नील नितीन मुकेशनेही मेजर रॉड्रिग्ज चांगला साकारलाय. नसीरुद्दीन शाहचा मुलगा विवान याने यातून पदार्पण केलंय, जे लक्षात राहणारं आहे. त्याने अत्यंत समजून आपली भूमिका केली आहे. नसीरुद्दीन शाह, जॉन अब्राहम, उषा उत्थुप (तीच ती, गायिका), रशियन कलावंत यांची कामगिरी ठीकठाक. सुझानाच्या घरातील मदतनीसाची भूमिका करणारा कलाकारही लक्षात राहतो.
संगीत हा विशाल भारद्वाजच्या चित्रपटाचा नेहमीच स्ट्राँग पॉइंट असतो. इन फॅक्ट मनासारखं संगीत करता यावं म्हणूनच दिग्दर्शनाकडे वळलेल्या विशालकडून ते अपेक्षितच आहे. पण ‘सात खून माँफ’मध्ये ‘डार्लिग’वगळता अन्य गाणी फारशी लक्षात राहत नाहीत. चित्रपट पाहताना ती गाणी आवडतात, चित्रपटाच्या मूडशीही जुळतात. पण त्यांच्यात फारसा गोडवा नसल्यामुळे नंतर लक्षात राहत नाहीत. श्रीकार प्रसादचं संकलन प्रभावी आहे. रंजन पलितचं छायालेखनही अव्वल दर्जाचं आहे.
एकंदरीत, ‘सात खून माँफ’ विशाल भारद्वाजच्या चित्रपटाकडून असलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण करत नाही, पण विशालचा चित्रपट पाहायचा असतोच. तेव्हा हा एक चित्रपट आपण त्याला माफ करू या.
No comments:
Post a Comment