एक वर्ष संपून दुसरं आलं तरी सिनेमाचा खेळ काही संपत नाही आणि सिनेमाच्या चाहत्यांच्या अपेक्षाही. सरत्या वर्षात कितीही अपेक्षाभंग पदरी आला असला तरी नव्या वर्षात येणा-या चित्रपटांविषयी उत्सुकता असतेच. म्हणूनच 2011 मध्ये प्रदर्शित होणा-या काही महत्त्वाच्या सिनेमांचा हा धावता आढावा खास तुमच्यासाठी..
काही काही सिनेमे प्रोमोजपासूनच लक्ष वेधून घेतात आणि सिनेमाविषयी जबरदस्त कुतुहल निर्माण करतात. गेल्या वर्षी ‘दबंग’चं तसं झालं होतं. तेच ‘यमला पगला दिवाना’च्या बाबतीतही होताना दिसतंय. मुळात धमेंद्र, सनी आणि बॉबी हे तीन देओल एका सिनेमात एकत्र येणं चित्रपट ‘हॉट’ करण्यास पुरेसं आहे. त्यात तिघांनी शिखांच्या भूमिकेत पडद्यावर धमाल केल्याचा फील देण्यात प्रोमोज यशस्वी ठरलेत. तिघांनी पूर्वी एकत्र काम केलेला ‘अपने’ अनपेक्षितरित्या हिट झाला होता. त्यामुळेच समीर कर्णिकसारखा फ्लॉप दिग्दर्शक असूनही चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. इंडस्ट्रीलाही या वर्षीचा, मल्टिप्लेक्सच्या मर्यादा ओलांडून जाणारा पहिला हिट याच चित्रपटाच्या रुपाने मिळेल, अशी आशा आहे. आमीर खानचा चित्रपट, मग तो त्यात केवळ अभिनेता म्हणून असो किंवा ‘पीपली लाइव्ह’प्रमाणे नुसताच निर्माता असो. आमीरच्या चित्रपटाबद्दल जबरदस्त उत्सुकता असते. आमीरचा चित्रपट म्हणजेच काहीतरी चांगलं, सकस आणि वेगळं पाहायला मिळणार याची खूणगाठ प्रेक्षकांनी बांधून ठेवली आहे. म्हणूनच ‘धोबी घाट’बद्दल घोषणेपासूनच उत्सुकता होती. त्यात प्रोमोजपाहून भरच पडली आहे. अर्थात हा चित्रपट ‘थ्री इडियट्स’ किंवा ‘दबंग’प्रमाणे युनिव्हर्सल हिट होईल किंवा व्हावा, अशी आमीर किंवा त्याची दिग्दर्शक पत्नी किरण राव यांचीच अपेक्षा नाही. कारण, या चित्रपटाची हाताळणी, सेन्सिबिलिटीज शहरी, उच्चभ्रू, मल्टिप्लेक्सवाल्या प्रेक्षकांच्या जवळ जाणा-या आहेत. या चित्रपटाचा हा क्लास त्याच्या प्रोमोजमधूनही दिसतो. शिवाय, ‘जाने तू या जाने ना’त झालेल्या कौतुकानंतर तब्बल अडीच वर्षानी पडद्यावर (हॉट) दिसणा-या प्रतीक बब्बरबद्दलही जबरदस्त कुतुहल आहे. मर्यादित बजेटमध्ये सकस सिनेमा करून तो सुपरहिट करण्याची आमीरची खुबी पाहता ‘धोबी घाट’चं भवितव्य जवळपास निश्चित मानलं जात आहे. चाकोरीबाह्य चित्रपटांचा आघाडीचा शिलेदार म्हणून मिरवता मिरवता स्वत:च्याच चाकोरीत अडकलेल्या मधुर भांडारकरने चाकोरी भेदण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. हलकाफुलका, नर्मविनोदी अशी, मधुरच्या चित्रपटाशी सहसा जोडली न जाणारी वैशिष्टय़ या चित्रपटात आढळतील, असे संकेत चित्रपटाचे प्रोमोज देत आहेत. रिअलिस्टिक, डार्क चित्रपटांचा दिग्दर्शक ही आपली ओळख झटकण्यासाठी जाणीवपूर्वक वेगळा प्रयत्न करणा-या मधुरच्या या चित्रपटाबद्दल म्हणूनच अपेक्षा आहेत. अजय देवगण-इम्रान हाश्मी ही गेल्या वर्षीच्या सुपरहिट ‘वन्स अपॉन अ टाइम’मधली गँगस्टर जोडी इथे संपूर्ण वेगळ्या रुपात दिसेल. तर ‘थ्री इडियट्स’मधला प्रख्यात ‘बलात्कारी’ पुरुष चतुर रामलिंगम अर्थात ‘ओमी वैद्य’ हेही याचं प्रमुख आकर्षण आहे. ‘कमीने’ आणि त्यापाठोपाठ ‘इश्किया’ या दोन चित्रपटांमुळे विशाल भारद्वाज इज इन बिग लिग. त्यामुळे ‘सात खून माफ’ हा या वर्षीचा ‘मच अवेटेड’ चित्रपट (नायिकाकेंद्रित असूनही) आहे. रस्किन बाँड यांच्या ‘सुझानाज सेव्हन हसबंड’ या कथेवर आधारित या चित्रपटात नायिका (प्रियांका चोप्रा) एकामागोमाग एक आपल्या सात नव-यांचा खून करते, अशी मध्यवर्ती कल्पना आहे. या सात नव-यांच्या भूमिकांमध्ये नसीरुद्दीन शाह, जॉन अब्राहम, नील नितीन मुकेश, इरफान खान, आदी नामवंत कलाकार दिसणार आहेत. विशाल भारद्वाजने यापूर्वीही रस्किन बाँड यांच्या ‘द ब्ल्यू अंब्रेला’ या लघुकथेवरून याच नावाचा नितांतसुंदर चित्रपट बनवला होता. त्याच्या सिनेमांची ‘टॅरँटिनो शैली’ आणि अभिजात साहित्यावरून उत्तम सिनेमे बनवण्याची त्याची हातोटी (मकबूल, ओमकारा, द ब्ल्यू अंब्रेला) यामुळे ‘सात खून माफ’बद्दल कमालीची उत्सुकता आहे. पतियाला हाऊस’च्या निमित्ताने एक विलक्षण योगायोग जुळून आला आहे. दोन वर्षापूर्वी अक्षयकुमारच्या मागे अपयशाचा फेरा सुरू करणा-या ‘चांदनी चौक टू चायना’चा दिग्दर्शक निखिल अडवानी होता आणि आता हा फेरा संपण्यासाठी अक्षयची भिस्त ज्या ‘पतियाला हाऊस’वर आहे, त्याचाही दिग्दर्शक निखिल अडवानीच आहे. भारतीय संस्कृती (म्हणजे पंजाबी) विरुद्ध पाश्चात्य संस्कृती यांच्यातला संघर्ष (?) चितारणारा अक्षयचा ‘नमस्ते लंडन’ सुपरहिट झाला होता. पतियाला हाऊसमध्येही हाच मसाला (अगदी पंजाबी पार्श्वभूमीसह) आहे. शिवाय त्याला खेळाची जोड देण्यात आली आहे. अक्षयसोबत प्रथमच अनुष्का शर्माची जोडी जमवण्यात आली आहे. ऋषी कपूरही एका दमदार भूमिकेत आहे. अभिषेक बच्चन आणि दिग्दर्शक रोहन सिप्पी ही ‘ब्लफमास्टर’ची यशस्वी जोडी य चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे. अत्यंत हुशारीने लिहिलेली पटकथा आणि त्यावरची दिग्दर्शकाची हुकुमत ही रमेश सिप्पीच्या सिनेमांची वैशिष्टय़ त्याच्या मुलाच्या या चित्रपटातही दिसली होती. म्हणूनच ‘दम मारो दम’ बद्दल उत्सुकता आहे. गोव्यातील ड्रग रॅकेटवर आधारित फॅक्ट्स आणि फिक्शनच्या सीमारेषेवर घुटमळणारा हा सिनेमा अभिषेक बच्चनसाठीही महत्त्वाचा आहे. परदेशात फिलॉसॉफीचा अभ्यास करून आलेल्या रोहन सिप्पीने ‘ब्लफमास्टर’ आणि ‘टॅक्सी नं. 9 2 11’ या दोन्ही वेगवान सिनेमांमध्येही मानवी भावभावनांचं उत्तम चित्रण केलं होतं. म्हणूनच आता ड्रग रॅकेटसारख्या थ्रिलरच्या अंगाने जाणा-या चित्रपटात तो काय वेगळेपणा आणतो, हे पाहाणं रोचक ठरणार आहे. ‘दबंग’च्या झंझावाती यशानंतर प्रदर्शित होणारा सलमान खानचा या वर्षातला हा पहिलाच चित्रपट. दिग्दर्शकाच्या खुर्चीत अनीस बाज्मी असला तरी यात त्याच्या नेहमीच्याच कॉमेडीला अॅक्शनचीही फोडणी देण्यात आली आहे. तेलुगूतल्या याच नावाच्या सुपरहिट चित्रपटाचा हा रिमेक आहे. सलमानसोबत असिनची जोडी जमवण्यात आली आहे. शिवाय, परेश रावल, महेश मांजरेकर हेही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. सुपरहिट सिनेमे आणि तगडय़ा परफॉर्मन्सेसनी सुपरस्टारपदावर हक्क सांगणा-या रणबीर कपूरचा सिनेमा म्हणून ‘रॉकस्टार’ला महत्त्व आहेच; शिवाय ‘जब वी मेट’ आणि ‘लव आज कल’वाल्या इम्तियाझ अलीचा सिनेमा म्हणूनही ‘रॉकस्टार’बद्दल उत्सुकता आहे. पारंपरिक प्रेमकथांना नव्या युगात अत्यंत तजेलदार पद्धतीने सादर करणारा नव्या पिढीतला आश्वासक दिग्दर्शक म्हणून इम्तियाझ अली तरुण प्रेक्षकांचा लाडका झालाय. इन फॅक्ट ‘जब वी मेट’ तर या दशकातलं ‘लव स्टेटमेंट’ बनलाय. त्यामुळेच या दोन सुपरस्टार्सना (दिग्दर्शकासाठीही हे विशेषण वापरायला काय हरकत आहे?) एकत्र आणणारा ‘रॉकस्टार’ या वर्षीचा महत्त्वाचा सिनेमा आहे. यात पदार्पण करणा-या नर्गिस फाक्री या मॉडेलकडेही सिनेसृष्टीच्या नजरा लागून राहिल्या आहेत. पदार्पणापासून अनेक नायिकांशी नाव जोडलं गेलेल्या रणबीरचं सध्या नर्गिसशी अफेअर सुरू असल्याच्या चर्चेलाही ऊत आला आहे. त्यामुळेही सिनेमा आतापासूनच चर्चेत आहे. ‘लक बाय चान्स’सारखा उत्तम सिनेमा देणा-या झोया अख्तरचा हा चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत आहे तो त्याच्या अनयुज्वल स्टारकास्टमुळे. हृतिक रोशन आणि कतरिना कैफ या चित्रपटाच्या निमित्त प्रथमच एकत्र येत आहेत, तर ‘देव डी’ची सुपरहिट जोडी अभय देओल आणि कल्की कोएचलिन हेही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. शिवाय निर्माता फरहान अख्तरही यातला एक नायक साकारतोय. त्यामुळे चित्रपट कमर्शियल की ऑफ बीट याचा थांगपत्ता लागत नाहीये. फरहान अख्तरसारखा निर्माता, रीमा कागतीसारखी (हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लिमिटेड) लेखिका आणि स्वत: झोया अख्तर या नावांमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता असणं स्वाभाविक आहे. गेल्या वर्षीपासून चर्चेत असलेला शाहरुख खानचा महत्त्वाकांक्षी सायफाय ‘रा वन’ यावर्षी आयपीएलच्या हंगामानंतर झळकतोय. अनुभव सिन्हासारख्या फ्लॉप दिग्दर्शकाला घेऊन भरमसाठ पैसा ओतून शाहरुख हा सिनेमा बनवत असल्यामुळे या चित्रपटाविषयी इंडस्ट्रीला तर कुतुहल आहेच; शिवाय शाहरुखचा कुठलाही सिनेमा लहान नसतोच, त्यात शाहरुख पहिल्यांदाच सुपरहिरो रंगवतोय. लाखो रुपये खर्चून बनवलेला त्याचा स्पेशल सूट, तो घालून चित्रिकरण करताना त्याला कसं घुसमटायचं, ‘रोबो’ प्रदर्शित झाल्यावर त्यातलं अॅनिमेशन बघून शाहरुख कसा चिंतेत पडला, मग ‘रा वन’साठी आणखी कल्पक अॅनिमेशन्स कशी करण्यात आली वगैरे बातम्या पसरवून शाहरुखने सुरुवातीपासूनचआपल्या या चित्रपटाबद्दल पद्धतशीर वातावरणनिर्मिती केली आहे. आमीर आणि सलमान या कट्टर प्रतिस्पध्र्याच्या तुलनेत गेल्या वर्षी शाहरुखचा ‘माय नेम इज खान’ अगदीच फिका वाटला. परदेशात सिनेमाने भरपूर गल्ला गोळा केला, असं शाहरुख आणि करण जोहर कँपने कितीही घसा खरवडून सांगितलं, तरी शाहरुखच्या सिनेमाला जी गर्दी अपेक्षित असते, ती ‘माय नेम इज खान’च्या वाटय़ाला आली नाही, हे सगळ्यांनीच पाहिलेलं असल्यामुळे शाहरुखसाठी ‘रा वन’ हा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. पंकज कपूरसारखा देशातला एक सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रथमच लेखक-दिग्दर्शकाच्या भूमिकेत आणि नायकाच्या भूमिकेत त्याचा मुलगा आणि आजचा आघाडीचा स्टार शाहीद कपूर हे काँबिनेशनच ‘मौसम’बद्दल उत्सुकता निर्माण करण्यास पुरेसं आहे. त्यात पंकज कपूरने या चित्रपटाबाबत इतकी गुप्तता बाळगली आहे की, शाहीद कपूरचा इंटरनेटवर लीक झालेला लुक आणि तो या चित्रपटात एअर फोर्स पायलटच्या भूमिकेत आहे, या व्यतिरिक्त चित्रपटाबद्दल काहीही माहिती नाही. त्यामुळे या उत्सुकतेत भरच पडली आहे. ‘मौसम’ पूर्ण होईपर्यंत शाहीद आणि त्याची नायिका साकारणा-या सोनम कपूरने एकही चित्रपट करायचा नाही, चित्रपटाविषयी कुठेही बोलायचं नाही, हे पंकज कपूरचे आदेश, त्याने दोघांनाही काही दिवसांची दिलेली सुटी, शाहीदला त्याचं अधूनमधून झापणं यांसारख्या बातम्यांमुळे ‘मौसम’भोवती गूढतेचं वलय निर्माण झालंय वर्षाचा शेवट शाहरुखच्या सिनेमाने करण्याची संधी त्याच्या चाहत्यांना ‘डॉन टू’मुळे मिळणार आहे. फरहान अख्तरने शाहरुखला घेऊन केलेला ‘डॉन’चा रिमेक सुपरहिट ठरल्याने त्याच्या या सीक्वेलचा घाट घालण्यात आला. अर्थात सीक्वेलची शक्यता पहिल्या भागातच ठेवली होती. त्यामुळे पहिल्या भागाचं कथानक यात पुढे नेण्यात येणार आहे. प्रियांका चोप्राच याही भागात शाहरुखची नायिका आहे. मधल्या काळात कॅमेऱ्याच्या समोर गेलेला फरहान अख्तर बऱ्याच काळाने पुन्हा दिग्दर्शकाच्या खुर्चीत परततोय. शाहरुख ऑर नो शाहरुख. पण नव्या पिढीतल्या एका एक्सायटिंग दिग्दर्शकाचा सिनेमा म्हणून ‘डॉन टू’ बद्दल उत्सुकता आहेच.प्रदर्शन - डिसेंबर
No comments:
Post a Comment